Saturday, March 17, 2012

क्षण.............


रात्रीची धुंदी अजून तशीच आहे. छात वर डोके ठेवून. डोळे मिठून कुशीत ती तशीच पडून आहे.किती लाजते ती. ती विचार करत असेल, मी झोपलीच आहे अस समजून त्याने उठून दिवसाला सुरुवात करावी. मी ही तितकाच ठाम अजूनही तिच्या केसात खेळतोय. काल रात्री अंघोळी नंतरच्या तिच्या भिजलेल्या केसांनचा सुगंध अजूनही तसाच आहे.  आणि बेड वरची चादर संपूर्ण विस्कटलेली. किती नखरे केले रात्र भर तिने. तिच्याकडे पाहता पाहता माझी नजर बेडरूमच्या त्या खिडकीकडे गेली. त्यातून डोकावणारं ते पारिजातकाच झाड...त्या उगवणाऱ्या सूर्यकिरणात छान दिसत होतं आणि...आणि त्या फुलांचा सुगंध जणू लपाछपी खेळत माझ्यापर्यंत पोहचत होता.

तिनेही ठरवलं असावं, आज यानेच उठावं. आता वाटलं जाऊ दे! आपणच हार मानूया. अलगद तिला शेजारच्या उशीवर सरकवून ठेवलं..तिच्या चेहेऱ्यावर एक निरागस हास्याची लाली होती. तिच्याकडे पाहून क्षणभर भ्रमित होवून तिलाच पाहत रहावसं वाटू लागलं. मग स्वतःलाच हसलो आणि बाल्कनीमध्ये आलो. सदऱ्याचे हात वर करून हात लांबवून आळस काढत हात उंचावले. तितक्यात दारावरची बेल वाजली. दार उघडून पाहिलं, तर वेटर कॉफी घेऊन आला होता. हे बरं आहे! न मागवता कॉफी बरी येते इथे असा विचार करत, दरवाज्यावरच कॉफी घेत मी त्याला टोलवलं तर तो चक्क हसला माझ्याकडे पाहून. थोडा वेळ मला काही कळेचना सदऱ्याकडे पाहतो, तर बटण वरखाली झाली होती. भुवया ऊंचावून काय म्हणून विचारलं, तर मान डोलवत तो निघून गेला. खरं तर तो माझ्याकडे बघून "गुड मॉर्निंग!" म्हणून हसला. पण मीच गडबडलो. चोराच्या मनात चांदणं या म्हणीचा अर्थ मला आज उमगला. स्वानुभवाने. 

हातात दोन कप घेऊन मागे वळतो, तर ती जागी झाली होती. चादर अंगावर सांभाळत बेडवर बसली होती. अंगावरची चादर तिने अजून गुंडाळून घेतली. गुडघ्यांवर कोपर टेकून तळहातावर स्वतःची हनुवटी ठेऊन माझ्याकडे पाहून छान हसली. पण कदाचित ते हसू खोडकर होतं. "शेवटी तूच उठ्लास ना आधी." असं काहीसं म्हणणार. मी ही हसत मान डोलावली .तिच्या हातात तो कप देत मी म्हणालो, "बस झाल बाबा! पाहतेस काय माझ्या कडे अशी. सध्या कॉफी पी. थंड होईल." कॉफीचा कप ओठांना लावून ती अजूनही माझ्याकडे बघते. ती कदाचित त्याच धुंदीत आहे. अजूनही तिला वाटत आहे की मी तिला जवळ घ्यावं. मी तिच्या जवळ जाऊन बसलो. ती मागे टेकून बसली होती. त्याचा आधार घेत सरकत माझ्या खांद्यापर्यंत येऊन पोहोचली होती. खांद्यापर्यंत तिचं डोकं येताच तिने माझ्याकडे बघत एक दीर्घ श्वास घेतला. "मला जवळ घे ना!" असं लाडिक म्हणाली. मी हसत तो कप बाजूच्या टेबलावर ठेवला आणि तिला कुशीत घेतलं त्या मिठीत मला ती खूप समाधानी भासली आज. जर तिला असंच वाटत होतं, तर मग काल एवढे नखरे करायची काय गरज होती? 

"आज आपण फिरायला जाऊया बाहेरच जेवूया आणि थोडी खरेदी ही होईल. मी पटकन तयार होते." असं म्हणत तिने मिठी सोडवली. मी ही डोळ्यानीच "हो" म्हणालो. तिने चार पावलं पुढे जात थांबून मागे वळून, "कोणती साडी घालू?" असं म्हणताच मी चटकन उत्तर दिलं. "जांभळी घाल." आणि ती निघून गेली अंघोळीसाठी. गंमत अशी की लग्नाची खरेदी चालू होती, तिला ती साडी खूप आवडली ही होती, पण आमच्याबरोबर लग्नाच्या खरेदीसाठी आलेल्या मंडळींच्या पसंती नापसंतीत ती साडी तशीच राहून गेली. तिला ती साडी आवडल्याची जाणीव मला झाली आणि मी त्या साडीचे पैसे चुकते करून ती दुकानदाराला बाजूला काढायला लावली. खरेदी संपल्यावर कोणाचेही लक्ष नसताना ती साडीची पिशवी तिच्या हातात सरकवली होती . 

तिची तयारी होईपर्यंत मी जाऊन बाल्कनी मध्ये उभा राहिलो. बाहेरचा अवर्णनीय निसर्ग पाहून माझे डोळे थक्क झाले. सूर्य किरणांनी सारा निसर्ग लख्खं चमकत होता. मी इतका दंग झालो पाहण्यात की, ती अंघोळ करून केस पुसत कधी माझ्या जवळ येऊन उभी राहिली कळालचं नाही. तिने माझ्या हाताला हात लाऊन म्हंटलं, "जातोस ना अंघोळीला..." मी तिच्याकडे पाहिलं, ती ही त्या कोवळ्या किरणात सुंदर दिसत होती. तिचा चेहरा त्या प्रकाशात पांढरा शुभ्र, नितळ, शांत असा दिसत होता आणि डोळे ही चमकत होते. मी तिच्याकडे पहातच राहिलो. किती वेगळी दिसत होती ती? नाजूक. गोरी पान. मोत्यासारखी. अगदी नजर काढावी अशी. मी तिचा चेहरा माझ्या हातात घेऊन क्षणभर तिच्याकडे पाहून तिच्या कपाळावर माझे ओठ टेकवले. लाजून ती थोडी दूर गेली, मी तिच्या कमरेभोवती विळखा घालून तिला जवळ ओढताच, हृदयाची धड धड वाढू लागली. तितक्यात दारावरची बेल वाजली. माझ्याकडून स्वतःला सोडवून तिने दार उघडलं. खाली रिसेप्शनवर फोन होता घरून. रूममधला फोन बंद असल्याकारणाने खाली जावं लागणार होतं. "तू जा बोल त्यांच्याशी. मी अंघोळीला जातो."

मी अंघोळ करून बाहेर आलो. आता मला खूप फ्रेश वाटतं आहे. पण ती नाही रूममध्ये. तिला बघायला म्हणून मी परत बाल्कनीमध्ये गेलो. तितक्यात ती दिसली. त्या पारिजातकाच्या झाडाखाली...


त्या झाडा खाली फुलांचा सडा पडलेला होता आणि ते माझ्या बाल्कनीतून खरंच खूप छान दिसत होतं. ते झाड भेदून सूर्य आणि झाडातला पल्ला गाठून सूर्यकिरणांसह धुक्यांचा हलकासा धूर होऊन त्या सड्या वर पडत होता आणि ती फुलं स्वच्छंदपणे सर्वत्र पसरून आपल्या सुगंधाने वातावरण सजवत होती. ती त्या सड्याजवळच्या बेंचवर बसली होती काहीतरी विचार करत. मी ही तिच्याजवळ गेलो. पण तिचं लक्ष नव्हतं. या गोष्टीचा फायदा उचलून मी ती फुलं वेचली आणि तिच्यावर उधळली. बसलो तिच्या जवळ. ती दचकली आणि मग हसली माझ्याकडे पाहून. माझ्या खांद्यावरती डोकं ठेऊन शांत बसली. मी ही डोळे बंद करून राहिलो. शांत झालं सगळं. आसपास कसलाही आवाज नाही. ते कोवळ उन, फुलांचा सुगंध, हिरवागार निसर्ग, थंड हवा, धुकं हे वातावरण मी कधीच विसरणार नाही आणि हा क्षण ही...

******************************

...अचानक जोरात हवा आली आणि झाडाची सुकलेली पानं माझ्या अंगावर पडली. मी दचकून उठलो, तर एक साठी गाठलेला वृद्ध गृहस्थ माझ्याकडे शून्यात बघत होता. मी घाबरून मागे झालो, तर आसपास असलेले काही जण माझ्याकडेच स्थिरावलेले मी पाहिले .कोणी हसत होतं. कोणी रडत होतं. कोणी स्वतःशीच बडबडत होतं. कोणी इकडे तिकडे पळत होत कोणाला तरी शोधत होतं. 

आसपास कोणी ही नव्हतं ती ही नव्हती. अंगावर शहारा जाणवला. मी एका झाडाखालच्या गोल कठड्यावर बसलो होतो. खूप किलबिलाट होता. पण हा पक्षांचा नाही. असायलममधील वेड्यांचा कर्कश किलबिलाट होता. कोणाच्या दु:खाचा, कोणाच्या सुखाचा, कोणाच्या शोधाचा, कोणाला तरी गमावल्याचा. मी तिला वेड्यासारखा शोधू लागलो. पण ती सापडलीच नाही. कंठ दाटून डोळ्यात पाणी आलं. मी कासावीस होऊन जोरात रडू लागलो. ती नाही माझ्या जवळ. मी तिला वेड्यासारखा शोधतोय. पण ती कुठेच सापडत नाही.कारण ती नाहीच आहे या जगात. मला सोडून खूप दूर गेली आहे. सारं काही आठवलं एका मागोमाग एक. त्या दिवसासारखी आज ती नव्हती माझ्या जवळ. आता माझ्या समोर काहीतरी वेगळंच होतं, ह्याची मला खात्री झाली. इथे कोणाचं कोणाकडे लक्ष नाही. जो तो आपल्या मनस्थितीत स्वतःलाच सावरण्याच्या प्रयत्नात आहे. ती खूप दूर गेली आहे. त्या रात्रीच्या लुकलुकणाऱ्या चांदण्यात. म्हणून वाट पाहतोय मी रात्रीची. जसा चातक पाहतो पावसाची...आतुरतेने....

एकदा का रात्र झाली की...ती येईल हलक्या हलक्या पावलांनी आणि आभाळात लख्खं चमकेल. मला विचारेल, "तू वाट पाहत होतास ना माझी...उशीर तर नाही केला नं?" आणि मी म्हणेन, "नाही गं! आणि झाला असला उशीर तरी चालेल मला...तुझी वाट पहाण्यात पण एक वेगळा आनंद आहे."

**************************

त्या...त्या हनिमूनच्या दिवसांनंतर आम्ही मुंबईतच शिफ्ट झालो आणि आमची रोजनिशी सुरू झाली. माझं आणि तिचं ऑफिसही. अलार्म बंद करून बेड वर कूस बदलत मी विचार करत होतो गेले काही दिवस. आई बाबा गावी गेले आहेत. आपण पण कुठेतरी बाहेर जावूया आणि परत अलार्म वाजला. हा तिच्या फोनचा अलार्म होता. तिला माहित आहे, घड्याळाचा अलार्म वाजला की मी तो बंद करून नुसतीच कूस बदलत लोळत राहतो. मी तिचा फोन अलार्म बंद करण्यासाठी घेतच होतो, तितक्यात ती उठली. "अगं! तू झोप. आज मी सुट्टी घेतली आहे ऑफिसमधून." तरी ती उठून बसली. सवयीने. केस विखुरलेले, लहान मुलांसारखी डोळे चोळत होती. कदाचित कामामुळे झोप अपूर्ण राहते तिची. पण आज जरा थकलेली दिसत होती. डोळे अगदी खोलावलेले. काळवंडलेली आणि थोडी अशक्त. 

"पण मी आज पाहतोय का हिला? की माझं लक्ष नाही तिच्याकडे?" मी स्वतःशीच पुटपुटलो. पण ती मस्त रोजसारखी दिवसाची सुरवात करण्यास निघाली. बेडवरून खाली उतरली. 

"आज तुला काय हवं नाश्त्याला?" तिने हसून विचारलं. मी ही हसत हसत "पोहे!" म्हणालो. पण तिच्या चेहेऱ्यावरचं हसू आजारी वाटलं आज मला. "बरं ठीक आहे. तू अंघोळ करून ये. मी जरा कामं आटपते." आणि ती निघून गेली. मी अंघोळ घेऊन बाहेर आलो. बघतो तर तिने माझा सदरा काढून बेडवर ठेवला होता. मी तयारी करून तिला हाक मारली, पण तिने काही उत्तर दिलं नाही. मी दुर्लक्ष करून बाहेर हॉलमध्ये येवून टीव्ही लावला. गाण्यांचा चॅनेल लावून तिला परत हाक मारली. "झाले का पोहे?" 

पण आतून आवाज नाही. 

"दिव्या! ए दिव्या! मी तुझ्याशी बोलतोय. अगं! झाले का पोहे?" पण तीचा आवाजच नाही. नेहमी हाक मारली की कुड कुड करत का होईना, पण "ओ" देणारी माझी दिव्या आज "ओ" का नाही देत? म्हणून किचनकडे गेलो, तर सगळं अस्ताव्यस्त आणि ती खाली कोसळून पडलेली. मी घाबरून तिच्याजवळ गेलो. तिला कुशीत घेऊन तिच्या चेहऱ्यावर पाणी मारलं, तरी तिला शुद्ध येईना. मी तिला उचलून बेडवर ठेवलं. डॉक्टरला फोन केला. .आता मी खरंच घाबरलो. तिचा हात हातात घेऊन तिच्याकडे आशेने पाहत होतो की, ती कधी उठते.

 ती खरंच वेगळीच दिसत होती. खूप अशक्त, थकलेली, आजारी. थोड्याच वेळात डॉक्टर आले. त्यांनी चेकअप करून काही औषध लिहून दिली आणि संकोच करत काही टेस्ट पण सांगितल्या. पण अजूनही तिला जाग आली नव्हती. मी तिच्या जवळ तसाच बसून राहिलो...बेडवर डोक ठेवून. पाच एक मिनिटांनी माझ्या हातातला हात निसटला असं जाणवून मी उठलो, तर ती बसली होती...अशक्त अवस्थेत. मी तिला हळव्या नजरेने पाहिलं आणि तिला घट्ट मिठी मारली. तिच्या बद्दलची भावना माझ्या डोळ्यातून असहाय्य   रीत्या बाहेर पडली. तिने माझ्या पाठीवर हात फिरवून मिठी सोडवली. माझ्या गालावर हात ठेवून थकव्याने जड झालेल्या पापण्या लुकलुकवून कापऱ्या स्वरात म्हणाली. 

"मी ठीक आहे रे! नको काळजी करूस. चल! तुला पोहे हवेत न? मी बनवते.. आणि आधी शांत हो बघू." तिच्या डोळ्यात माझी काढलेली फसवी समजूत स्पष्ट दिसत होती. तिचा त्रास असहय्य होता. हे तिला आणि मला चांगलंच कळून चुकलं होतं. मी तिला म्हटलं, "आज तू नको, आज मी बनवतो. काय ते आज माझ्या हातचं निमूटपणे खायचं."

ती हसली माझ्याकडे पाहून. तिचं ते आजारी हसू पाहून का होईना, पण मला हायसं वाटलं आणि मी किचनकडे गेलो. तसं मला थोडे पदार्थ बऱ्यापैकी जमायचे. कारण आई बाहेर गेली असताना किमान पोहे आणि चहा कसा बनवायचा हे माहित होतं मला. माझे पोहे बनवून झाले होते. चहासाठी कप घ्यायला वळलो, तर दारात ती बाजूच्या कठड्याला टेकून उभी माझ्याकडे पाहत होती. आणि थोडं चालून पुढे येणार, तोच ती कोसळली. मी तिला सावरलं, तर माझ्या कुशीत माझ्याकडे पाहून हसली. तिला दिलेल्या इंजेक्शन मुळे असेल कदाचित. 

"अगं! अगं! कोणी सांगितलं तुला उठायला बेड वरून?"

"रोज शर्ट पॅंट टाय घालून हँडसम दिसणारा माझा नवरा आज किचनमध्ये कसा दिसतो...'' तिचं वाक्य अर्ध्यातच राहिलं.

आम्ही दोघही हसू लागलो. मी तिला सावरत बेडपर्यंत सोडलं आणि नाश्ता ही आणला. 


"आज माझं कायमचं पोट भरणार वाटतं!..." 

हे ऐकून मी हसता हसता शांत झालो आणि तिला रागावलो.

"अरे वेड्या! काय माहित तू परत कधी बनवशील माझ्यासाठी असं काही. त्यासाठी तर मला असं आजारीच पडावं लागेल ना? कौतुकाने म्हंटल रे!" 

आणि गप्पा मारत पोहे आणि चहा कधी झाला कळलचं नाही. मी तिच्या बाजूला गप्पा मारत बसलो, तर ती गप्पा मारत झोपली. मी तिला उशीवर ठेवणार तितक्यात जागी झाली. "चल आता जाग आलीच तुला, तर तयार हो! डॉक्टरकडे जावून थोड्या टेस्ट करून घेवूया." 

कंटाळा करत टेस्ट करून आम्ही घरी आलो. संध्याकाळी रिपोर्ट घ्यायला गेलो. तिला बाहेरच्या खुर्चीत बसवून मी आत डॉक्टरांना भेटायला गेलो. डॉक्टरांनी दबक्या आवाजात मला "बसा! बसा!" म्हणत फाईलचं पान उलटलं.

डॉक्टर :- "आता तुम्हाला त्यांची खूप काळजी घ्यावी लागेल. त्या सध्या खूप अशक्त आहेत शरीराने आणि मनाने देखील."
दक्ष :- "हो ठीक आहे डॉक्टर. मी काळजी घेईन तिची." 
डॉक्टर :- "ठीक नाही मिस्टर दक्ष! त्या खूप पोखरल्या गेल्यात. त्यांना जे जे आवडतं ते सगळं करा मिस्टर दक्ष." (ते उठून माझ्या जवळ आले माझ्या खांद्यावर हात ठेवला )
दक्ष :- "..."
डॉक्टर :- "मिस्टर दक्ष त्यांच्याकडे वेळ खूप कमी आहे."
दक्ष:- "हे....हे तुम्ही काय बोलताय डॉक्टर?" (माझा श्वास खूप वाढू लागला हृदयाची धड धड असहाय झाली. डोळे काठोकाठ भरले.)
डॉक्टर :- "हो मिस्टर त्यांना कॅन्सर आहे. कर्क रोग...आणि त्या आधीच खूप नाजूक असल्यामुळे आतून पोखरून गेल्यात. त्यांच्यावर काही उपाय शक्य नाही आणि त्यांचा शरीराला ते पेलवेल याची शक्यता नाही. त्या फक्त ठीक असण्याचा आव आणत आहेत. त्यांना तुमची खूप गरज आहे. जास्तीत जास्त वेळ काढा त्यांच्या सोबत."

तिला कर्करोग असल्याचं कळालं. ती कायमची दुरावणार...मी कसं काढणार आहे माझ आख्खं आयुष्य? कशी भरणार आहे ही अपूर्णतेची पोकळी? असे विचार डोक्यात येवून मी संपूर्ण संपलो होतो. माझ्या डोक्यात विचारांचं खूप मोठ वादळ आलं होतं, जे सगळं उध्वस्त करून जाणार होतं. माझ्या पायाखालची जमीनच निसटली. मला काही सुचेच ना. माझे डोळे आपोआप मिटले. आता मात्र डोळ्यातल्या पाण्याला वाट दाखवायची गरज नव्हती. मी कस सहन करणार होतो हे सगळं? माझ्या उधळलेल्या आयुषाचा पसारा आवरत मनाला सावरत मी शांत झालो. डॉक्टरांनी मला समजावलं. पण ही गोष्ट पचवणं खूप कठीण होतं. त्यात काहीच दिवस राहिले होते तिच्या जवळ. माझ्या सुखाच्या संसाराला आता चांगलंच ग्रहण लागलं होतं. कसा बसा सावरून बाहेर आलो. तिच्याकडे पाहिलं. मला आता राहवतंच नव्हतं. पण तिच्यासमोर हे नको. तिने भुवया उंचावून "काय?" म्हणून विचारलं आणि खोटं हसून मी काहीबाही ओठात येईल ते बोललो. 

"काही नाही गं! असंच जरा अशक्तपणा आहे न तुला? काळजी घ्यायला सांगितली आहे. बरं का मॅडम! मी आता काही दिवस घरीच राहणार आहे. बघूया तरी माझ्या बायकोला काय झालं ते." तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणालो. "चल घरी जाऊया!" माझ्या जड मनाला सहानुभूतीची फुंकर घालत मी हे कसं म्हटलं? माझं मलाच ठावूक. 

"नको. आपण फिरुयात न जरा मोकळ्या हवेत. समुद्र किनारी जावूया." तिने अशक्त आणि कापऱ्या आवाजात म्हटलं आणि मी तिच्या इच्छापूर्तीसाठी हसून "हो" म्हटलं. 

"आज किती दिवसांनी कारच्या फ्रंट सीटवर बसणार आहे न मी? थोडा वळसे घालूनच जावूया लाँग ड्राईव्ह पण होईल." 


कार मध्ये स्लो सॉँग लावून आम्ही थेट समुद्र किनारी गेलो. तिथे छान गप्पा मारल्या. भेळ खाली. "हा क्षण इथेच थांबू देत. ती अशीच माझ्या जवळ राहू देत." मला मनोमन हेच वाटत होतं. संध्याकाळच्या अंधारात तो भला मोठा विशाल समुद्र खळखळून हसत होता माझ्या दु:खावर असं मला वाटलं काही क्षण. पण ती माझ्या खांद्यावर डोकं ठेवून शांत बसलेली. 

"किती छान आहे न ते आभाळ? आख्खं विश्व उराशी घेऊन निर्धास्तपणे त्या विशाल समुद्रात स्वतःला झोकून देत आहे. आणि हा समुद्र...शांत, नितळ चांदणं पांघरून त्या चंद्राच्या प्रतिबिंबाकडे आकर्षित होवून पाहत आहे. हे रम्य दृष्य किती सुखकारक वाटत आहे न डोळ्यांना! पण त्याची दुसरी बाजू पण आहे. तो एखाद्या व्यक्ती सारखा भासतो मला कधी कधी. माणसाला हा गुणधर्म समुद्राकडूनच मिळाला असावा बहुतेक. बघ न समुद्र सगळ दुख वूराशी बाळगून खळखळून हसतोय...अगदी तुझ्यासारखा..." 


मी चकित होवून तिच्याकडे पाहिलं. माझा हात हातात घेवून ती म्हणाली.

"मला खूप पोखरलं आहे रे या आजारपणाने. खूप कमी दिवस आहेत न माझ्याकडे? .मला त्याची जाणीव आहे..." ती बिलगली मला अगदी उन्मळून. आणि मग अचानकच तिच्या डोळ्यातून टपटप अश्रू वाहू लागले. मी तिला घट्ट मिठी मारली आणि रडू लागलो. त्या मुसळधार पावसासारखा. "मलाही खूप जगायचं आहे रे तुझ्या बरोबर. तू बनवलेले कांदे-पोहे आयुष्यभर खायचे होते. पण मी हरले या जीवन-मृत्यूच्या लढाईत. मला सोडू नकोस. प्लीज! प्लीज! मला सोडू नकोस. मी...मला...मला इथेच राहायचं आहे. कुठे नाही जायचं." 

घाबरत काहीतरी बडबडत राहिली. मी फक्त ऐकत होतो. मनाला झालेल्या वेदनांनी डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूंना सहन करत होतो. थोडा वेळ ती तशीच शांत बसून रडू लागली. खूप रडली माझ्या मिठीत. नंतर काहीसा विचार करून तिने स्वत:ला सावरलं. 

"मी तुझ्यासमोर असं रडत नाही बसणार. कारण त्यामुळे तू पोखरला जाशील आणि मला ते नको..." ती कापऱ्या आवाजात स्वतःला सावरत म्हणाली. 

पण तिच्या मनाची घालमेल कळत होती. ती गेल्यानंतर माझा काय होईल? या विचारांनी ती अजूनच विखुरली...घाबरली. माझा चेहरा हातात घेवून थरथरत माझ्या डोळ्यात पाहून बोलू लागली. 

"मी आहे न? नको...नको रडूस तू. मी...मी आहे तुझ्या बरोबर आणि मी नसेन, तर त्या चांदण्यात शोध मला. मी नेहमी असेन तुझ्या सोबत आणि हा तुझ्या आयुष्याची नवीन सुरवात कर. मी नाही बघू शकत तुला असं..." 

ती विखुरलेल्या गोंधळलेल्या अवस्थेत घाबरून मला चाचपू लागली. माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवू लागली. मी तिला शांत करत तिच्या ओठांवर बोट ठेवून नकारार्थक मान डोलवली. माझ्या डोळ्यातलं ते दुख पाहून ती शांत झाली ती माझ्या कुशीत. थोडा वेळ बसून समाधानाने घरी जावूय म्हणाली. मग बाहेर थोडं जेवून आम्ही घरी गेलो. तिने माझ्या आणि तिच्या आई बाबांना फोन करून गप्पा मारल्या आणि औषध घेऊन माझ्या कुशीत झोपी गेली. तिला शांत पाहून मी ही झोपलो आणि उठलो ते थेट दारावरची बेल वाजली. माझे आई बाबा गावावरून परतले होते आणि त्यांच्या मागोमाग तिचे आईवडील पण तिच्या कापऱ्या आवाजाचा विचार करून तिला भेटायला आले होते. 

"कुठे आहे दिव्या? काल रात्री वेड्यासारखी बडबडत होती. आम्हाला रहावेचना म्हणून आलो." 

"नाही...तिची तब्येत ठीक नाही..." मी त्यांना तिच्या जवळ घेवून गेलो 

आईने तिला जवळ घेतलं. तिच्या डोक्यावरून हात फिरवला. मी तिच्यासमोर बसलो होतो. माझ्याकडे हसत ती स्थिरावली होती ती. कायमची. मी तिला उठवण्याचा खूप प्रयत्न केला. ती उठलीच नाही. 

"दिव्या? ए दिव्या? उठ ना!...उठ ना! अगं बघ! आई बाबा पण आहेत न बरोबर. तुला काही नाही होणार दिव्या! उठ ना अगं!"

**************************

"सर? सर..."

एक वॉडबॉय माझ्या जवळ आला. "सर चला...जेवायला चला...जेवणाची वेळ झाली. औषध पण घ्यायची आहेत न?"

हो! मी गेले काही दिवस इथेच आहे...असायलममध्ये...

"दिव्या? ए दिव्या? उठ ना!...उठ ना! अगं बघ! आई बाबा पण आहेत न बरोबर. तुला काही नाही होणार दिव्या! उठ ना अगं!" असं म्हणत मी बेशुद्ध झालो, ते इथेच शुद्ध आल्यासारखं भासलं मला. कारण त्या धुंदीत किती दिवस इथे आहे आणि या दिवसात काय झालं मला काही आठवत नाही. आयुषातली पाच वर्ष गायब आहेत माझ्या जीवनातून इतकं माहित आहे मला. त्यात थोडी सुधारणा होत आहे म्हणून इथे असल्याची जाणीवही होत आहे. आणि या आठवणी...त्या नाही पाठ सोडत माझी. अगदी रितं रितं करून जातात. आयुष अपूर्ण होऊन जातं पण आता मी ठीक आहे. काही दिवसातच माझी सुटका होणार आहे इथून...मी माझ्या आयुष्याला नवीन सुरवात करणार आहे.

तसं या फुलांनीच मला शिकवलं आहे की झाड सुकतं...पण...प्रत्येक पानगळी नंतर ते पुन्हा बहरत ही. काही दिवसात ते झाड पुन्हा बहरेल आणि स्वतःच्या सुगंधाने सगळा निसर्ग सजवेल. एक नवीन पालवी फुटायला वेळ लागतो, म्हणून आस सोडून किंवा हरून जमणार नाही. आपणच खंबीर राहिलं पाहिजे. तरच या प्रत्येक ऋतूची मजा कळेल. आयुष्याच्या सुकलेल्या झाडाला नवीन पालवी फुटेल. जर मी खंबीर राहून माझ आयुष्य धीटपणे जगलो, तरच मी तिची आठवण कायम माझ्या मनात जपू शकेन. जशी प्रत्येक रात्र नवीन सकाळ होण्याची, आयुष्यात नवीन किरणं भरून एक नवीन दिशा दाखवण्याची वाट पाहते आणि जशी एक सकाळ शांत शीतल नितळ लखलखीत चांदण्यांनी भरलेल्या, काळ्याभोर आभाळात टिमटिमणाऱ्या, कसली ही चिंता न करता लुकलुकून नवीन प्रकाशाने आभाळाचे सौंदर्य वाढवून, एक नवीन अनुभव देणाऱ्या त्या रात्रीची वाट पाहते... 

पण या सगळ्या म्हणण्या पुरत्या गोष्टी. खरं तर माझं आयुष्य ती नसताना अपूर्णच आहे. कारण तिने एक वेगळी पोकळी निर्माण केली आहे माझ्या मनात. आज मला कळला अपूर्ण शब्दाचा अर्थ. तो कितीही सहज लिहिता बोलता आला...तरी तो खूप मोठी पोकळी निर्माण करून जातो. पूर्ण न होणारी एक अशी पोकळी, जी आपण कधीही भरून काढू शकत नाही ती म्हणजे अपूर्णता. कारण अपूर्ण या गोष्टीला काही पर्यायच नाही आणि नसतो. त्या कितीही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, तरी त्या अपूर्णच राहतात.

मी तिची आठवण जपेन...पण त्या प्रत्येक रात्रीची वाट तितक्याच आतुरतेने पाहीन, जी मला तिच्या सहवासाने पूर्णतेची जाणीव देईल. पण त्याच प्रत्येक रात्री नंतर एक सकाळ होईल. मला परत रिक्त करेल....आणि परत तिच्या आठवणींपासून वंचित होवून मी अपूर्ण होईन. मी आयुष्यभर अपूर्णच राहीन. तिच्याविना. कारण अपुर्णतेला काही पर्याय नाही आणि नसतो...अपूर्ण, अपूर्ण आणि फक्त अपूर्ण...

...पण मी त्या रात्रीच्या चांदण्यात तिच्या सहवासाने पूर्णतेची जाणीव करून माझ्या मनाची समजूत घातली आहे.




चैताली कदम 

Thursday, March 15, 2012

स्पर्श........



स्पर्श असावा आसवां सारखा
ओघळताना जाणवणारा
कधी आनंद कधी दुखं
मनसोक्त वाहणारा .............


कधी असावा पावसा सारखा
हवे मध्ये मिसळणारा
गारव्याचा एक श्वास
मना मध्ये जपणारा...............


कधी असावा फुलासारखा
बेधुंद दरवळणारा
निसर्गात स्वतःची अशी
एक जागा बनवणारा ..............


कधी असावा नदी सारखा
खळखळून हसणारा
स्वरांच्या दुनियेत एक
नवीन सूर भरणारा ....................


कधी असावा पाण्या सारखा
नितळ शांत असणारा
पाहिलं  जरी मनात
स्पष्ट पणे दिसणारा ..............


कधी असावा शब्दानं सारखा
मना पर्यंत पोहोचणारा
उमलून हसू ओठांवरती
सार काही बोलणारा .................


कधी असावा नजरे सारखा
सजवून सांगणारा
निरागस पणे मिथुन डोळे
मन स्थिती मांडणारा .................


कधी असावा श्वासांन सारखा
नेहमी सोबत असणारा
पापण्यांन सम  निमिष भर मिठून
नवीन आस बांधणारा .................





चैताली कदम