हंतरुणावर कोणाला तरी चाचपत ती उठली.बार्थ्रूम मध्ये बादली भरून धो......धो......वाहत होती.अंथरुणातच बसून पाठीवरचा सैल झालेला अंबाडा सोडून तिने परत घट्ट गुंडाळून बांधला.पाण्याचा आवाज ऐकून कपाळाला आट्या आणून तोंडातून "चक्क...."असा आवाज काढत ती बाजूला झोपलेल्या आपल्या मुलांकडे पाहू लागली.डाव्या बाजूला कोपऱ्यात तिची गोंडस निरागस मुलगी आणि उजव्या बाजूला ३मुलगे अशी ४ मुलं आहेत तिला.तरी सुद्धा देखणी,लांब काळ्या भोर केसांची होती. आपल्या मुलांकडे ती पाहत हसली.त्यातला सर्वात लहान मुलगा तिच्या कुशीतून गडबड लोळत तिच्या पाया पर्यंत पोहोचला होता.त्याला त्याच्या जागी निट ठेवत ती उठली.थंडीचे दिवस होते.त्यांच्या अंगावरची सरकलेली चादर तिने नीट केली.आणि सकाळची कामं आटपायला सुरवात केली.साडीच्या निऱ्या खोचत वाहून चालेली बादली सरकवून दुसरी बादली नळाला लावली.कामं आटपून अंघोळी नंतर तयार होऊन चहा घ्यावा म्हणून कंटाळलेल्या अवस्थेत ती किचन जवळ गेली.खोली तशी छोटीच होती.मुलांच्या शिक्षणा खातर मुंबईत येवून राहिलेली हि जनी. आधी कुठल्या तरी पडक्या चाळीत राहत होती.चाळ मोडीत गेल्या मुळे मुलांच्या हट्टा खातर एका ५ मजली इमारतीत दुसऱ्या माळ्यावर भाड्याने राहत आहे.जनीला स्वच्छता फार प्रिय.तिच घर नेहमी स्वच्छ आणि घरात मोगऱ्याचा एक मंद सुहास दर्वळत असे.बरीच वर्ष मुंबईत राहिल्या मुळे तुटक-मुटक इंग्रजी शब्द येत होते.पण भाषेवर काही प्रभुत्व मिळवता आल नाही अजूनही.किती झालं तरी माणूस आपली बोलण्याची पद्धत नाही बदलू शकत.हे तिच्या आणि तिच्या मुलांच्या भाषेतून बोलण्यातून जाणवत असे.पण तिची मुलं या भाषेचा उपयोग जनिशीच करत असत शाळेतील किंव्हा इतर लोकांशी व्यवस्तीत अशी मराठी शुद्ध भाषा वापरात असत.काही वर्षां आधीच तिचा नवरा तिला आणि तिच्या मुलांना निराधार आणि पोरखं करून गेला.तेव्हा पासून जनीच मुलांची आई आणि बाबा झाली.राब राब राबून धुनी भाडी करून मुलांना वाढवू लागली.
जनी :- "हुश...!!........आई ......आई गं !......." लई पाठ दुखू लागलीया.कामाला जातानि मेडिकल मधून दवा घीन "
ती स्वतःशीच पुटपुटली.चहा साठी ठेवलेल्या पाण्यात चहा पावडर टाकून साखरेचा डबा उघडला तर रिकामी.कमरेकडे खोचून ठेवलेली चिल्लर मोजू लागली नेमके पाचच रुपये होते.आता तिला हायसं वाटू लागलं
"रव्या ?........ए...!...रव्या? बघ की रं.....साखर संपलिया !
आंतूस का जरा दुकानातून?कामाला जायचं हाय!"
ए ....पोर...!..ऐकतूस का रं !
"उठकी बाबा बग कि दिस उजाडला बी!कवा पतुर असं गडबाड लोळणार हाईस "
रवी:- "ए आय..!....नग ना गं तरास दिवूस. झोपुदे कि ग मला........."
रव्या आता जाणार नाही हे तिला कळालं.
तिने अगदी चेहेरा गरीब करून तिच्या मुलीला हाक मारली .
"मुग्धे जा कि ग माय तू तरी......."लई तलप लागलिया बग "ए! मुग्धे............."
मुग्धे :- "अं! ............."ए आय !एक दिस जा की अशीच.मला कटाळा आलाय गं !.....लई झोप आली बग "
आता मात्र जनीने तोंड वाईट केलं.कोणी उठायला तयारचं नवतं.आगीने चहा उकळून अर्धवट झालेलं पाणी तिने कस कस गिळल...........आणि निघाली कामाला.लांब सडक केस अगदी घट्ट गुंडाळून बांधलेले.बोट भर टिकली लावलेली थोडी गोरी मघ्यम बांद्याची काटकिळी.साडी एका बाजूने खोचून पदरही कमरेला खोचला होता.पायाला अपुरी पडणारी दोन ठिकाणी शिवलेली ती चप्पल रेमटवट ती चालत राहिली .मधेच तिचं लक्ष एका मेडिकल कडे गेलं.हातातली ती ५ रुपयांची चिल्लर पाहून ती म्हणाली .
"मयो..!....बर झालं साखर न्हाई आणली ते.दवा कशी घीणार व्हती म्या .!...........पण माझी लेकरं.?..ती तरी बिन साखरेचा चहा कसा पिणार हाईत. ताई कड मागते थोड पैस."
जनी मन मिळवू असल्याने ज्या घरी काम करायची त्यांना ताई म्हणून हाक मारत असे.मेडिकल जवळ जावून ती नुसतीच उभी राहिली खूप गर्दी होती.मेडिकल मधल्या मुलाने विचारलं
"काय पाहिजे मावशी..........."
जनी:-"अंग फार दुखायल रे लेकरा कोणती तरी गोळी दि कि !.........जरा बर वाटन अशी....."
त्याने आतून एखादी पेनकिलर दिली असेल बहुतेक आणि ती हसून गोळी घेत तिथून निघाली . न थांबता चालत चालत कामात पोहोचली.शिड्या चढून दम टाकत दारावरची बेल वाजवली.एक १२/१३ वर्षाची चिमुकली दार उघडत जनीला आत घेत म्हणाली .
"काय झालं मावशी ? एवढ्या जोरात श्वास का घेताय? दम का लागला तुम्हांला ?"
जनी:-"काय नाय गं माय उशीर झाला म्हणून पटापटा शिड्या चढून आलेना.
"पण चिऊ घरी कशी आज तू सुट्टी हाय व्हय !"
चिऊ :- "हो......मावशी आज दसरा आहे न. विसरलात कि काय ? "
"बर थांबा तुम्ही बसा जरा.मी पाणी आणते तुमच्या साठी.फार लांबून येता न तुम्ही ? "
जनी :- (तिच्या कडे २ मिनिट बघून विचार करू लागली चिऊ पाणी आनते म्हणली आणि मला सकाळची आठवण झाली.माई लेकरं मया साठी साखर आणून देवू नाही शकत.पण हि जिच्या घरी मी मोलकरीण आहे ती माझं दुखं जाणून पाणी आणत होती.)
"नगं म्या घेती आपसूकच ........तुला नगं तरास बळे माझ्या मुळ."
कमरेचा पदर काढून तोंड पुसत म्हणाली
पुढे जाता जाता पुटपुटली," आज दसरा हाय म्हणून आपली पोर अशी आबड धोबड लोळत व्हती आणि काल मुग्धी माझ्या ब्लाउज ला हात शिलाई मारीत व्हती.आज घालायची आसन तिला मई साडी."
डोक्याला हात लावत ती म्हणली "मयो सनसूद बी कळत न्हाई मला . अशी कशी इसरले म्या दसरा "कामाच्या आणि घरातल्या दगदगीत संन बी इसरले म्या !"
बोलता बोलता किचन कडे वळली "ताई म्या आले बर का !"
"आज काय बनवायचं जेवणला?"
ताई :"आज आपण पुरण पोळी बनवूया.पण त्या आधी जरा चहा नाश्ता बनवून सगळ्यांना दे आणि स्वतः पण घे कामात वेळ कसा जाईल कळणार नाही."
जनी चहा नाश्ता घेऊन चिऊच्या आजी कडे गेली "आजी ! ओ आजी! चाय आणली बगा . दार उघडतान का आज तुम्ही? " जनी हसऱ्या स्वरात म्हणाली
"जनी !बाळा थांब गं! आलेच मी"आजीनि बेडरूमचा दरवाजा उघडला जनी ने ते ताट टेबलावर ठेवलं आणि निघाली
आजी :-(आजी तिच्या कडे पाहू लागल्या )"जनी तबेत ठीक नाही का गं तुझी "
जनी :-"न्हाही आजी म्या ठीक हाय "
आजी :- "नाही ग तोंड अगदी उतरलं आहे.बस बघू माझ्या जवळ "
जनी :- "नाही आजी काम पडल्याती. म्या जाते (नजर चोरत ती म्हणली तिला ठाऊक होतं आजी काळजाला हात घालतील आणि तसाच झालं )
जनी :- "न्हाई आजी मई पाठ अगदी भरून आल्यागत झालय बगा पण....पण म्या दवा खाल्ली हाय . तस आता जरा बर वाटू लागलं "
आजी :- "अग एवढी ३/४ कामं कशाला करतेस लागोपाठ शरीराला थोडा आराम मिळाला पाहिजे "
जनी :- "व्हय आजी आता कोण हाय करायला.संध मालच करायला लागतं.घरी बी आणि बाहेर बी कुठं कुठं लक्ष द्यायचं.तशी माई पोरगी करते घरचं काम पण तिला बी शाळेत जायचं असतना तरी बी ती जमन तीवढ काम करती "
आजी :-"किती मुलं तुला "
जनी :- "चार हाईत पण चारी बी चार परीची हाईत बगा....एक मुलगी तीन मुलगे
"ठिवून गेलाय त्यो मया साठी माग.मला बी घेऊन गेला असता तर बर झालं असतं "
आजी :- "अगं ..!अस का बोलतेस "
जनी :- "व्हय आजी म्या खरच बोलती पार थकून गेलीया पोरात "जाउद्या म्या जाते मला काम करायची हाईत येते म्या . तुम्ही खावून घ्या पटा पटा "
आजी :-"बर ठीक आहे पण काळजी घे "
जनी :-"व्हय! व्हय!...." म्हणत ती आजीच्या खोलीतून बाहेर पडली
चहा नाश्ता सगळ्यांना देऊन उरले-सूरलेला स्वतः केला.आता जरा पोटाला बऱ्या पैकी आधार झाला होता.मग तिने खोचून ठेवलेली ती गोळी घेतली .
जनी ने जेवणाची सगळी कामं आटपली पण पुरणपोळी करताना तिचे डोळे भरून आले.तिच्या नवऱ्याला पुरणपोळ्या खूप आवडत.त्याच्या आठवणीने तीच मन जरा मावळालं होत. पण आपलं दुख कोणाला कळू नये म्हणून ती वरवर हसतचं होती.ते आटपून आता कपडे भांडी करण्यासाठी निघाली ते आवरे पर्यंत दुपारचे २ वाजले होते.सकाळच्या ९ चा नाश्ता होऊन बराच वेळ झाला होता. आता मात्र पोटात कावरी भरून जनी भुकेने आतुर झाली.कामं आटपली होती.पदराने हात पुसत
"ताई !......ताई !.....निघाले म्या"
"थांब जरा जनी...."डब्याच झाकण लावत त्या तिच्या जवळ आल्या "हे.. घे...घेवून जा तुझ्या मुलां साठी "आणि हे घे (हातात ५०० रुपयांची नोट टेकवत म्हणाल्या ) बराच वेळ झाला नं जेवणा मुळे "
जनी ने हसत तो डबा पिशवीत टाकला आणि "चला निघते "म्हणून निघाली .आज ती थेट घरी जाणार होती . बाकीच्या कामावरून सुट्टी मिळाली होती.थकलेल्या अवस्थेत ती इकडे तिकडे पाहत चालत राहिली ते घर येई पर्यंत.धापा टाकत दोन माळे चढून दार उघडून आत आली तर घरात पसारा पुढ्यात मुलगा गडबड लोळत अजून हंतरुणात पडला होता.मुलगी किचन जवळ काही तरी खटपट करत होती.आणि लहान दोघं दंगा करून.त्या झोपलेल्या भावाला अजून का नाही उठत म्हणून त्रास देत होती.
"रव्या! ए रव्या !" अजून लोळतोस व्हय " उठ की रं आता. बग की साडे तीन झाले " हातातली पिशवी पुढ्यात आलेल्या मुलांच्या हातात दिली "घी खा थोडं थोडं ताईनं पुरणपोळ्या दिल्या हाईत "लहान मुलाने हसत हातातली पिशवी उघडत एक घास तोडला.
जनी :-"माय पाणी दितीस का गं "
आपल्या मुलीला ती म्हणत भिंतीला टेकून बसली
मुग्धा :-"ए आय घी कि काम करायले म्या "
जनी :-(रागाने)"लई चालावं लागतं.आल्यावर हातात पाण्याचा गलास पण दिऊ शकत नाही का दिस भराचा तुम्ही.फकस्त खायचं तीवढ कसं जमतंय तुम्हासनी "
मोठा मुलगा तिची बडबड ऐकून बिछान्यातून उठून बार्थरूम कडे वळला.पण पसारा तसाच ती चिडलेली पण काही न बोलता निमूट पणे हंतरुणाची घडी घालत स्वतःशीच पुटपुटली.तितक्यात लहान मुलगा येवून तिला बिलगला
"ए आय आपल्याला बी कर ना गं पुरणपोळी लई खावीशी वाटायली"
जनी:-"व्हय रं लेकरा करती म्या.तस पण आज दसरा हाय ना मग करू कि
"रव्या ! रव्या ! जा जरा भाऊला घिऊन बाजारात आणि गूळ घिऊन ये "
रवी :-" म्या न्हाही जाणार.आताच उठलोय लगीच कुठं जाऊ "आणि लहान भावाला टपली मारत "पुरणपोळी खायची म्हनतुय ढवाळं लागल्यात का?"अस काहीस पुटपुटला
जनी:-"अय! काय मारतूस त्याला.राहुदी कि एवढ्या आवडीन मागायल पोर "
रवी:-"मग पाठव कि त्याया बा ला "
जनी :- (हात उगारून त्याच्या कड दोन पावल टाकत म्हणाली ) "कोणाचा बा काढतुस रं तुआ न्हाई का त्यो "
रवी :-(जनीचा हात धरत तिला हिसकावत तो म्हणाला) "अय म्हतरे का म्हुण माराया लागलीस सामान अंतू म्हणतोय नं "
जनी खाली कोसळली आणि रडू लागली तिची मुलं तिच्या भोवती गोळा झाली कोणी डोळे पुसत होतं कोणी केसांवरून हात फिरवत होतं.कोणी बिलगून नुकतच रडत होतं .
जनी :- "आपल्या बा वाणीच निघालास मुडद्या !"पण एवडं खर त्यो असता तर असं दारोदरी भटकाया नसतं लागलं मला "
(त्याच्या कडे हात दाखवत )ह्या भाडखाऊ च्या अश्या शिव्या आणि मार नसता खावा लागला मला "त्यो बी मारायचा.पण जवळ बी घ्यायचा .लई मार खालाय म्या त्याचा.भाऊच्या वेळी गरवार असतानी मला खूप मारलं व्हत त्यांन.मला चांगलच आठवतय.घरात लय भांडण झाल व्हतं तव्हा.तुया बा लई दारू पिऊन अला व्हता.कुणाशी तरी झगडे बी जाले व्हतं . इवढा उशीर का केलात म्हणले तर रागारागात दोन थोबाडीत मारून लात मारून खाली पाडलं आणि डाव्या बाजूला पोटात घपदिशी चाकू घुसवला .म्या खूप कळवले काही सुचेच ना हाताला रगत आणि डोळ्याला पाणी.संध अंग सुन्न झालं व्हतं आणि म्या बेसुध झाले डोळे उघडले ते दवाखान्यातचं.मला झाग आली तर हा माया वाजूला बसलेला जणू ह्याला माई लई काळजी.त्याच्या डोळ्यात माझ्या साठीच पिरेम मला अगदी येगळी असल्याची जाणीव करून द्यायचं.पण अस व्हतं तर मारलं कशाला.माझं नशीब म्हणून तो चाकू टीचभर आत गेला.माझ्या भाऊला काही नाही झालं. मार बी तेवडाचं आणि पिरेम बी तेवडाचं
"भिंतीला टेकून गुढग्यावर डोक टेकत ती म्हणली.आणि मुलं एखादी गोष्ट सांगतात तशी आ करून ऐकत होती.
रव्या :-(भिंतीला टेकून उभा होता )"झालं का कीर्तन गाऊन.अय बये! दि कि पैक उगा टाइमं खोटी नग करू.दि आता लवकर "
जनी :-(रागारागात कंबरेला खोचलेले पैसे काढत फेकत म्हणाली ) "धर ऐ मुडद्या घी घी "
रवी :-(हसत)"मयो ! पगार झाला वाटतं म्हतारीचा पैक वाली झाली "दि कि ग मला बी थोड पैक
तो निर्लजा सारखा हसत म्हणाला जणू काही झालंच नाही.आपल्या आईला इतका त्रास झाला ती रडली याचा त्याच्या चेहेरऱ्यावर काहीही परिणाम दिसत नवता.
जनी :-"हाय का लाज मुडद्या.भाजून खाल्ली का लाज तव्यावर"तरी बी हसतंय कस बेन "
रागाने बाजुची चप्पल फेकून मारत ती म्हणाली "सांग त्याला डाळ आणि गुळ आणाया"
तो हसतं टिंगल करत चपल्ल घालत निघून गेला.मग ती त्या मुलांना जवळ घेत डोळे पुसत गप्प करू लागली "जा काही तरी आन खायला भूक लागली आसन पोरांना.काई खाल्ल व्हतं का ?"
मुग्धा :- "न्हाई आय कुनी बी काय बी खाल्लं न्हाई.हे दोघ आताच थोड्या येळा आधी उठलेत. आंगोळी झाली पण खानंपाणी काय बी नाही.आज सुट्टी हाय ना "आणि त्यो गड बड लोळत पडला व्हता. कवा पासून हाका मारायले म्या.पण जरा सुधिक हल्ला न्हाई "
तिच्या गालावर हात फिरवून म्हणली "जावूदी तू जाय काही तरी आन जेवायला.मला बी भूक लागली "आता मुग्धाला हि कळाल आपल्या आईला भूक लागली.पण ती एवढी शी पोर तिला काय आणि कितपत येत असेल जेवण.कसंबसं तिने आपल्याला जमणारा डाळ भात आणि बटाट्याची भाजी तेवढी केली होती. तिघांनी हि जेवून घेतलं आणि एका जुन्या कामात बक्षीस म्हणून मिळाली खोपट्यात ठेवलेली ती टीव्ही लावली आणि जे दिसेल ते मुकाट पने पाहू लागले.तेवढ्यात खालून हाक ऐकू आली भाऊ !ऐ भाऊ! आणि भाऊ खिडकी पाशी येवून उभा राहिला खाली पाहिलं तर रवी सामान घेऊन उभा होता भाऊ वरून खिडकीतूनच ओरडला "काय दादा"
रवी :-"खाली ई लवकर माया हातातलं समान घिवून जाय."
भाऊ :-"वर ई दादा आई बोलवती"
रवी :-"न्हाई तुचं ई मी भाईर जातुय "
तितक्यात जनी भाऊच्या मागे खिडकीत आली.
जनी :- "आरं रेड्या वरी ई कि ! "कवाचा आरडायलं लेकरु.तरी बी समजत न्हाई का?"
आता रवी चिडून धावत वर आला पण तो खूप चिडलेला असल्याने घरात येताच जनी कडे पाहत हातातलं तिला शिवी घातली समान आणि पैसे फेकले सामानाची पिशवी भिंतीला जावून आदळली सर्व डाळ आणि गुळ घर भर पसरलं.आता मात्र जनी खूप चिडली होती.ती धावत त्याच्या कडे गेली.त्याच्या शर्टची कॉलर पकडून त्याला रागाने गदागदा हलवत विचारू लागली
"इवडा राग इयाला रेड्या तुला.लई मोठा झालास व्हय रं ! माज आलाय तुला.पैक गेलना पाण्यात आता कुठून आणू म्या.कस करून घालू मया पोरांना " आणि तिने रागात त्याच्या गालावर एक चापट ओढली.त्या मुळे तो आणखी चिडला आणि कॉलर वरचा तिचा हात झटकत तिला हिसकावलं आणि शिव्या देत तिच्या पाठीत जोरात फटका मारला "मला मारतीस"
जनी ला काही सुचेच ना.आपल्या मुलाने आपल्यावर हात उघरला.या झटक्याने ती कळवळत रडत तिथेच पडून राहिली.तो तावातावाने तिथून निघून गेला.आता सगळं शांत झालं.दमल्या मुळे डोळ्यातून ओघळणार पाणी सुखायच्या आतंच ती झोपून गेली होती.तोड्या वेळाने हळू हळू डोळे लुकलुकत ती उठली घड्याळात पाहिलं तर संध्याकाळचे पाच संव्हा पाच झाले होते.घर अगदी स्वच्छ लखलखीत चमकत होतं.मुलं बाहेर खेळायला गेली होती.शांतता पसरलेली तिची मुलगी मुग्धा तिच्या जवळ आली तिला माहित होतं आईच्या डोळ्यालं पाणी काठावरच आहे.मी काही बोलले तर आई खूप रडेल तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली "जा तोंड धुवून घी म्या चाय दिती तुला "
थोडं झोपल्यामुळे आता जनीला तसं बंर वाटत होतं भिंतीचा आधार घेत ती उठली तोंड हातपाय धुवून बाहेर येवून बसली."चहा हाय का ?"
मुग्धा :- "हाय आय"
जनी :-"साखर आणायची आसन ना?"
मुग्धा :-न्हाई म्या माझ्या साठवलेल्या पैशान आणली कि साकार सकाळी "
चहा पिता पिताच तीने आशेने विचारलं "डाळ आन गुळ कुठंय गं " त्यावर खांद्यावर हात ठेवत मुग्धा म्हणाली "मी पसारा आवरून ठीवलाय डाळ बी साफ करून ठिवली आणि गुळ बी तसाच हाय फकस्त दोन तुकडं झाल्यात" जनीला हायसं वाटलं आणि ती मनापासून हसली चहा झाल्यावर कप उचलत ती म्हणली "चला बाई पुरणपोळ्या करायच्या हाईत डाळ शिजवायची हाय.तुया बा ला लई आवडायच्या पुरणपोळ्या.मला परतेक सनाला कराया लावायचा अन आवडीन खायचा .पुरणपोळ्या म्हनलं ना कि त्याई आठवण व्हती मला.सकाळी बी आली त्याई आठवण आन डोळ भरलं पर कामात कस बस रडू आटपलं.कुणाला सांगू म्या दुख.ह्यो लेक तर हयो असा.जावुदि उगा कशाला तरस करून घिऊ.आता कामाला लागते." तिने सगळं विसरून खुप आवडीने पुरणपोळ्या बनवायला सुरवात केली.पुरणपोळी होता होता मुलं हि घरी परतली होती.
"मला दि ना ग पुरणपोळी "म्हणत तिच्या भोवती घोळका घालून बसली.
"थांबा पोरानो जरा.आधी हात पाय धुवून घ्या बगु .तोवर म्या देवाला निवद दावती अन मग खायला बसा सगळे "
सगळं आवरून तिने घरातला केर-कचरा काढून हात पाय धुतले. देवाला नैवद्याच ताट पुढ्यात ठेऊन साकडं घालू लागली "देवा माझ्या घरात सुख शांती नांदू दे.का अस दारोदरी भटक्या लावतूस."
तीतक्यात शेजारच्या मुली नट्टा-पट्टा करून दसऱ्याच सोन द्यायला आल्या
"काकू!काकू!"सोन घ्या " करत तिच्या हातात अपट्याची पान कोंबत तिच्या पाया पडू लागल्या
"बस ! बस ! नगा मया पाया पडू .राहुदि खूप शिका आणि मोठ्या व्हा "वाकत असलेल्या प्रत्येक पोरीला ती म्हणत होती.मुलांना हा सन खूप आवत असावा.या आपट्याच्या पानांचा सोनं म्हणून वाटप म्हणजे गंमत वाटत असावी.हातात आपट्याची पानं टेकवत पायाला हात लावत हा गंमतीशीर प्रोग्राम चालत असे सगळ्यांचे कैतुकाचे बोल ऐकून मुलं खुश होत असत आणि मुली हि "छान दिसतेस"असं म्हणतातच मुलीच्या गालावारीची कळी खुलत असे.अशा रीतीने हि मुलं मोठ्यांचा आशीर्वाद आणि मज्या करत असत.
"मुग्धा ! तू का नाही तयार झालीस अजून"चाल लवकर तयार हो " तिच्या मैत्रिणी तिला आग्रह करू लागल्या
"बर ! तुम्ही व्हा पुढे मी येते तयारी करून " मुग्धा ने आधीच आईची पेटीतील साडी काढून ब्लाउजला टाके मारून आपल्या मापाचा करून ठेवला होता.सगळी तयारी करून ठेवली होती पण भांडणा मुले तशीच राहून गेली.
जनी:-"मुग्धे ! जा कि ग ! म्हणलीस न त्यांना मग व्हय कि तयर आणि जाय त्यांच्या बरोबर " काढ पेटी म्या काढून दिती साडी तुला "
मुग्धा :-"नग आई म्या काढून ठिवली हाय पर मला न्हाई जायचं आता.राहुदी "
जनी :-(तिला पोटाशी कवटाळून म्हणाली ) "जा बाळे म्या निसवती साडी तुला तू नग मन नाराज करूस जाय बिगी बिगी "
आणि मुग्धा तिथून निघून गेली.फ्रेश होऊन "आय मला हि साडी निसव " म्हणत आतल्या खोलीतली साडी आणून तिने जनीच्या हातात दिली.आणि काही तरी आणायला म्हणून आत गेली .हातातली ती साडी पाहून क्षणभर ती स्थिरावली आणि डोळे भरून आले.पण तिने ते पाणी डोळ्यातच सुखु दिलं . तितक्यात मुग्धा आली
"आई ! आई ! नेसवतेस ना साडी "
"हो गं ! निसवती बाय "
तिला साडी नेसवून तिचे केस विंचरून दिले.मुग्धा नटूनथटून आईला दाखवायला आली
आई!...बघ....
"मयो छान दिसायलीस गं !"असं म्हणत तिच्या कानामागे जनीने काळ तिठ लावलं
"तुया बा असताना आता तर डोळ भरून पाहिलं असतं त्यानं.कशी गोजिरवाणी दिसायली माझी मुग्धा म्हणत डोळ पाणावल असतं आता पतूर त्याच "आणि जनीचे डोळे पाणावले
तिच्या मैत्रिणीनी तिला हाक मारली "मुग्धा ! झाली का तयारी तुझी.बाहेर जायचं आहे चलं "
आय ! म्या जाती ग! मला पैस दि ना.आम्ही फोटू काढाया जाणार हाईत"जनी कमरेला खोचलेले पैसे चाचपत म्हणाली "मगाशी राव्यान रागान फेकलेल पैस कुठ ठीवलास"
"हा त्या गलासा खालीच ठीवलत बग " जनीने फळी वरचं ग्लास उचलून पाहिलं तर ५५ रुपये होते त्यातले ५०रुपये काढत तिच्या हातावर टेकवले
"लवकर घरी ई बाई.इथ तिथ उंडगु नगं " म्हणत ५ रुपये तिने कमरे जवळ खोचले.
मुग्धा मान डोलवत हसत साडी चाचपत तिथून निघून गेली.
आता घरी कोणी नवत सारं काही शांत चाळीतीली मुलं जिकडे तिकडे आपट्याची पान वाटायला फरार झाली होती.आता मात्र जनी शांत झाली.घरात कोणीही नवतं बाजूच्या घरातल्या गाण्याचा मंद आवाज फक्त ती आणि देवा पुढे लावलेल्या त्या उदबत्तीचा दर्वळ अगदी कोना कोनात पसरला होता जनी त्या भिंतीला टेकून शांत बसली होती.तिच्या नवऱ्याच्या फोटो कडे एकटक पाहत राहिली . आज तिला बहुतेक त्याची जास्तच आठवण येत होती.
*******************************
"जने म्या जातुय गं!जरा उशिरानच ईन.काम हाय फोन बिन नग करूस "
"आव पण आता रातीचं १० वाजल्याती.आता कंच काम हाय "
"अग नग पाटी कटकट लाउस चल म्या निगालो "म्हणत तिचा नवरा घराच्या बाहेर पडला.मुलांच आणि स्वतःच जेवण आटपून साफसफाई करून दमल्या मुळे हंतरुणावर पडताच तिला छान झोप लागली.सकाळी सकाळी धाड धाड कोणी तरी दरवाजा वाजवू लागलं तशी ती तडफडत जागी झाली मुलं हि जागी झाली आणि चिडून जनी म्हणाली "आला असन दारू पिऊन "उठून तिने दार उघडलं चाळीत बाहेच्या टोकावर दुकाना जवळ राहणारी दोन मुलं घाबरून धापा टाकत उभी होती.
जनी घाबरली काय झालं त्यावर ती मुलं फक्त "दुकाना जवळ मामा !मामा ! मामला" म्हणत अडकली जनीला वाटलं भांडण झालं तिच्या नवऱ्याच कोणाबरोबर ती मोकाट धावत सुटली थेट दुकाना जवळ तिच्या पाठी तिची मुलं पण.कसलीही हि चिंता न करत काही लागेल याच भानच नाही राहिलं तिला. दुकाना जवळ खूप गर्दी होती.ती बाजूला सारत पाहते तर तिचा नवरा चाकूचे सपा साप वर होऊन रक्त बंबाळ होऊन पडलेला.त्याच्या जवळ जावून त्याच डोक मांडीवर घेत ती "ओ !ओ! काय झालं तुम्हांला काय झालं " डॉक्टरला बोलवणा कुणी बोलावना डॉक्टरला "म्हणत ती घाबरत ओक्साबोक्शी रडू लागली.गर्दीत उभा असलेल्या एका इसमाने त्याचा हात हातात घेतला.त्याची नाडी तपासू लागला.त्याच्या हृदयावर हात ठेवत कान ठेवत त्याचे ठोके ऐकू लागला.नंतर तिच्या कडे पाहत नकाराआर्थक मान डोलवत तो उठला.ती आणखी घाबरली "ओ !ओ !उठाना उठाना " रडणाऱ्या आपल्या मुलांकडे पाहत "रव्या !ए रव्या! बग कि उठाव कि तुया बा ला.मुग्धे ! ए मुग्धे !मार कि हाक तुया बा ला" म्हणत ति भानावर आली तर मगाशी भिंतीला टेकून बसलेली ती तशीच होती.तिच्या डोळ्यातून अपोआप पाणी ओघळू लागले.
तुया या दोस्ती खातत्यानं माय संध आयुष्याच बदलून टाकलं.मित्र मित्र करून ज्यायला जवळ किलस त्यानंच तुया पाठीत चाकू घुसावंला.म्या किती सांगत व्हते.नग जाऊ बाहीर हि अशी भाई गिरीची काम नग.जीव घाबरून मला कस कस वाटत व्हतं.पर तुया पुढ काय म्हणलं तर.....तर.....तू मला परत भांडशील आन मारशील म्हणून काय बी बोले नाय.पण इवढ काय झालं व्हतं ते तुया मित्रांनी मारकरी करून तुला मराया लावलं .फकस्त इवढ कळलं मारामारीत तुझ हे असं झालं पण न्हाई तुया वरच्या जळनुकीवरून अन तुझ्या हातात सतत नांदणाऱ्या लकशिमीन तुया जीव घेतला.त्यादिवशी तुया बद्दल सांगत आलेल्या मुलां मूळ तुला बगाया धावत आले तर तू चाकूचं सपासप वार व्हवून रक्त बंबाळ जीमिनीवर आस्था व्यस्थ पडलेला.अन माझ्या अंगातला जीवाचं निघून गेला.तुला असं बगून म्या घाबरले. किती वूठावलं तुला.तरीबी उठ्नास.तुला कशी काळजी वाटली न्हाई आमची .हि अशी ह्याची त्याची रूम विकून ,दलाली मिळवून,भाईगिरी करून ,ऊरा पोटाशी चाकू सुऱ्या मिरवून काय भलं व्हणार व्हतं तूअ.शेवटी केला ना घात तुया मित्रांनी तुआ. हातात पैसा व्हता तर तुये मित्र तुया बरोबर फिरायचे पण मनात डाग ठीऊन.तुला ते कदी बी कळलं न्हाई.तुला दारू पाजून मैत्री खात्यात उशिरा पतुर थांबून केला घात तुआ.अलगत तुआ काटा काढला आणि टाकून दिलं तुला त्या दुकाना पाशी.किती तडपडला आशीन.किती तरास झाला आसन तुला.सकाळी तू मेला समजल्यावर परत दुकाना जवळ येऊन काय म्हाहीत न्हाई असा आव आणत माझी माज्या बघत उभ अस्तीन त्या लोकांच्या गर्दीतच.तुला मेलेला बगितल असन अन खुश झाली असतीन संधी .पण त्या गर्दीतला नक्की कोणता चेहेरा खोटा व्हता कसं कळणार व्हतं मला.तुया मरणा नंतर धुमाकुळच घातला या लोकांनी.पेपरात काय छापलं तुया खुना बद्दल .मोठमोठ्या सबा काय भरावल्या.इतकाच काय खोट्या आधारच नाटक बी केलं.अन दुसऱ्या दिवशी हजर झाले कर्जाचा मोर्चा घिऊन.अन ते बी गोड बोलून.पर तुई ती हिशेबाची वही माया कमी आली.मला ठाव व्हतं.तुआ जो बी काय यवहार हाय त्यो संधा ह्यात हाय मग काय खोल्ली वई अन धरलं एकेकाला काट्यावर.कुणाच बी कर्ज नवतं .अन व्हत ते बी तू फिडलं व्हतस त्यायंच्या सह्या बी घीतल्या व्हत्यात.म्हणून कोणाची भिशाद झाली न्हाई वर तोंड करून बोलायची.तू लिहून ठीवल्या परमाने दोन घर आन काही पैक ब्यांकित मिळालं.पर तू असतास तर यायला आणखी शोभा आली असती.पण तू गेलास अन सगळ्याचा इस्कोट झाला.
"का सोडून गेलास मला एकटीला.किती एकटं वाटू लागलं मला ठावं हाय तुला.लोक कश्या कश्या नजरेने बगतात मया कड.तू व्हतास तर मला नजर वर करून बी पाहिलं नाही.लई घान वाटते त्यांच्या नजरांची मला.आज दसरा तुया आवडीचा सन पण तू न्हाईस दर दसऱ्याला पुरण पोळ्या करून घालाया लावायचास.आपली पोर बी कशी वागतात माया बरोबर कोणीच नाही माय दुक ऐकाया कुणी बी नाय.फकस्त तुच व्हतास पण तू बी मला असं मधीच सोडून गेलास.मला मारायचास पण जवळ बी करायचास.मला काय हव नको संध बगायचास.आता मला काय झालं तर कुणाला सांगू म्या "कुणीच नाही कुणी म्हणजे कुणीच नाही मया सठी फकस्त दर्वळते ती तुझी आठवण ह्या सुगंधा वानी " आणि तोंडावर हात घेऊन रडू लागली .
चैताली कदम